Saturday, October 8, 2011

वसंत दत्तात्रेय गुर्जर

- चंद्रकान्त पाटील

शांत, आत्मकेंद्री, उंच, लांब नाकाचा, खाली बघून चालणारा, या अफाट विश्वात आपण एकाकी आहोत ही जाणीव आपल्या चालण्यातूनही तुम्हाला करून देणारा, जाड भिंगांचा चष्मा घालणारा आणि हमखास गर्दीत हरवणारा असा माणूस म्हणजे वसंत दत्तात्रेय गुर्जर. वसंतची कविता ही कुठल्याही पूर्वसुरींच्या संस्कारांशी नातं नसलेली, स्वयंभू आणि फक्त महानगरातच शक्य असलेली कविता आहे.

महानगराचं विक्राळ रूप सगळ्या नात्यांचे संदर्भ बदलून टाकतं. माणसामाणसातलं अंतर विस्तारित करतं. दुराव्यातून भयानक एकटेपणा जाणवतो. ही जमीन, हे आभाळ, ही घरं, ही माणसं, ही झाडं हे काहीच आपलं नाही, कुणीच आपलं नाही, आपण विलक्षण एकटे आहोत- आणि या एकटेपणाच्या असह्य जाणवेतूनच वसंतची कविता येते. कवितेच्या संरचनेतसुद्धा हा तुटलेपणा होता- वसंतच्या ‘गोदी’ या पहिल्या संग्रहात. नंतर या जाणिवेतूनच कधी उत्कट वेदना तर कधी थंड उपहास उमटत राहिला. सगळ्या अनुभवांना सगळ्या जगण्याला थंड अलिप्ततेचं परिमाण चिकटलं. वसंतची कविता बऱ्याचदा या अलिप्ततेशी अशा काही पातळीवरून जवळीक करीत जाते की कविता आणि गद्यातलं पारंपरिक अंतर पुसट होत जातं आणि गद्यप्रास निरस कंटाळवाण्या जगण्याचा दुःखद स्पर्श तुमच्या आत जाणवू लागतो. पण नेहमीच असं होत नाही. निव्वळ उपहास अलिप्ततेच्या पातळीवरच ही कविता असती तर वसंत अस्तित्त्ववादाच्या उपऱ्या धृवापाशीच घट्ट चिकटून राहिला असता. पण वसंतच्या कवितेनं हा धोका टळला, अस्तित्त्ववादाचा आंधळा रस्ता नाकारला. हे सामाजिक- राजकीय पर्यावरण कितीही विसंगतींनी भरलेलं असलं तरी आपलंच आहे, ह्या पर्यावरणात राहूनच आपले बंध निर्माण केले पाहिजेत, नातीगोती नव्यानं जोडली पाहिजेत अशी भूमिका वसंतच्या नंतरच्या कवितांमधून अधूनमधून प्रबळ होताना दिसते. समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. म्हणूनच ती लघुनियतकालिकांची वाट सोडून समकालीन कवितेच्या हमरस्त्यावर येते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते.
***
चंद्रकान्त पाटील
(चंद्रकान्त पाटील यांच्या ‘पाटीवरच्या टीपा’ या साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून, पाटील यांच्या परवानगीने)

No comments:

Post a Comment