Monday, September 6, 2021

'कोलाहल' प्रकाशित झाला

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा नवीन कवितासंग्रह 'तुला प्रकाशना'च्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी प्रकाशित केल्याचं कळतं. कवितासंग्रहाची प्रत गुर्जरांना त्यांच्या मुंबईतील घरी देताना डावीकडे चंद्रकांत पाटील. उजवीकडे गुर्जरांच्या पत्नी.



तुला ग्रंथ वितरण या फेसबुक पानावरून परवानगी घेऊन फोटो इथे चिकटवला आहे. कवितासंग्रह विकत घ्यायचा असेल, तर 'तुला'च्या पानावर संबंधित तपशील दिला आहे. 

Tuesday, July 25, 2017

नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार

वसंत गुर्जर यांना २०१६ सालचा 'नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार' मुंबईत ३० एप्रिल २०१७ रोजी देण्यात आला. 'भारतीय भाषांतील कवितेत विशेष योगदान देणाऱ्या कवी'ला हा पुरस्कार देण्यात येतो. गुर्जर यांच्या संदर्भात पुरस्कार समितीनं नोंदवलेली टीप अशी: 

"१९६०नंतरच्या काळातील महत्त्वाचे कवी म्हणजे वसंत दत्तात्रेय गुर्जर. आधुनिकतावादी मराठी कवितेचा वेगळा आविष्कार त्यांच्या कवितारूपाने झाला. वसंत गुर्जरांच्या कवितेने महानगरीय संवेदनशीलतेचे वेगळे असे भान व्यक्त केले आहे. ‘गोदी’, ‘अरण्य’ व ‘समुद्र’ हे त्यांचे तीन संग्रह प्रकाशित झाले आहेत. लघुनियतकालिक चळवळीतले कवी म्हणून ते ओळखले जातात. महानगरातील कष्टकरी, श्रमकरी जगाला वेगळी अशी नीती कवितेतून प्राप्त करून दिली. मुंबईच्या कष्टकरी माणसांचे जग कवितेत मांडले. रूढ सांकेतिक काव्यभाषेपेक्षा स्वतंत्र कविताभाषा घडविली. गद्याचा कवितेतील लक्षवेधक वापर आणि तिरकसपणा या प्रयोगशीलतेतून नवी कविता घडविली. अलीकडील काळातील त्यांच्या कवितेतून जागतिकीकरण काळातील महानगरांचा कालस्वर त्यांनी मांडला."

डावीकडून आनंद जोशी, वसंत गुर्जर, निखिल वागळे

या कार्यक्रमात गुर्जर यांनी केलेलं भाषण खालील व्हिडियोमध्ये पाहाता-ऐकता येईल:

Saturday, October 8, 2011

वसंत दत्तात्रेय गुर्जर

- चंद्रकान्त पाटील

शांत, आत्मकेंद्री, उंच, लांब नाकाचा, खाली बघून चालणारा, या अफाट विश्वात आपण एकाकी आहोत ही जाणीव आपल्या चालण्यातूनही तुम्हाला करून देणारा, जाड भिंगांचा चष्मा घालणारा आणि हमखास गर्दीत हरवणारा असा माणूस म्हणजे वसंत दत्तात्रेय गुर्जर. वसंतची कविता ही कुठल्याही पूर्वसुरींच्या संस्कारांशी नातं नसलेली, स्वयंभू आणि फक्त महानगरातच शक्य असलेली कविता आहे.

महानगराचं विक्राळ रूप सगळ्या नात्यांचे संदर्भ बदलून टाकतं. माणसामाणसातलं अंतर विस्तारित करतं. दुराव्यातून भयानक एकटेपणा जाणवतो. ही जमीन, हे आभाळ, ही घरं, ही माणसं, ही झाडं हे काहीच आपलं नाही, कुणीच आपलं नाही, आपण विलक्षण एकटे आहोत- आणि या एकटेपणाच्या असह्य जाणवेतूनच वसंतची कविता येते. कवितेच्या संरचनेतसुद्धा हा तुटलेपणा होता- वसंतच्या ‘गोदी’ या पहिल्या संग्रहात. नंतर या जाणिवेतूनच कधी उत्कट वेदना तर कधी थंड उपहास उमटत राहिला. सगळ्या अनुभवांना सगळ्या जगण्याला थंड अलिप्ततेचं परिमाण चिकटलं. वसंतची कविता बऱ्याचदा या अलिप्ततेशी अशा काही पातळीवरून जवळीक करीत जाते की कविता आणि गद्यातलं पारंपरिक अंतर पुसट होत जातं आणि गद्यप्रास निरस कंटाळवाण्या जगण्याचा दुःखद स्पर्श तुमच्या आत जाणवू लागतो. पण नेहमीच असं होत नाही. निव्वळ उपहास अलिप्ततेच्या पातळीवरच ही कविता असती तर वसंत अस्तित्त्ववादाच्या उपऱ्या धृवापाशीच घट्ट चिकटून राहिला असता. पण वसंतच्या कवितेनं हा धोका टळला, अस्तित्त्ववादाचा आंधळा रस्ता नाकारला. हे सामाजिक- राजकीय पर्यावरण कितीही विसंगतींनी भरलेलं असलं तरी आपलंच आहे, ह्या पर्यावरणात राहूनच आपले बंध निर्माण केले पाहिजेत, नातीगोती नव्यानं जोडली पाहिजेत अशी भूमिका वसंतच्या नंतरच्या कवितांमधून अधूनमधून प्रबळ होताना दिसते. समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. म्हणूनच ती लघुनियतकालिकांची वाट सोडून समकालीन कवितेच्या हमरस्त्यावर येते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते.
***
चंद्रकान्त पाटील
(चंद्रकान्त पाटील यांच्या ‘पाटीवरच्या टीपा’ या साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून, पाटील यांच्या परवानगीने)

Friday, October 7, 2011

वसंत गुर्जरांच्या कवितेमधून फिरताना

गुर्जरांचं राजा ढाले यांनी काढलेलं स्केच (ललित, दिवाळी १९६८)
- राजा ढाले

१.
सभोवतालचा रिक्त अवकाश आणि डोईवर पसरलेलं अजस्त्र आकाश कोरत नव्याने उभ्या राहणाऱ्या, गगनाला भिडू पाहणाऱ्या, नवनव्या इमल्यांच्या उंचच उंच टोकावरून – आपला आणि आपल्या भोवती जगणाऱ्या असहाय्य, आक्रंदत्या जगाचा, मुंबईत उपटलेली कुणीतरी अदृश्य शक्ती कडेलोट घडवून आणत आहे, आपल्या समग्र अस्तित्त्वाचाच घास घेत आहे, आणि या अर्थानं मुंबई शहरातल्या धनदांडग्या बिल्डर मंडळींनी एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांशी स्पर्धा करीत गाठलेली ही ‘अतुलनीय’ उंची, ही इथल्या सर्वसामान्य माणसाला भुईसपाट करीत आहे, त्यांच्या घरादारावरून गाढवांचा नांगर फिरवीत आहे, आपल्या इमारतींच्या रचल्या जाणाऱ्या नव्या पायात जिवंत गाडून वा चिरडून टाकत आहे, किंवा या जमिनी मूळ मालकांकडून धाकदपटशाने कवडीमोलाने विकत घेऊन, या ‘भूमिपुत्र’ असलेल्या मूळ मालकांनाच इथून कायमचेच उखडून टाकून, हद्दपार करण्यात येत आहे, देशोधडीला लावण्यात येत आहे... आणि मुंबईच्या मूळ निवाशांचं हे ‘ह्युमन गार्बेज’ मुंबईच्या उपनगरापलीकडच्या ‘कचरा-कुंडी’त, उकिरड्यात निर्दयपणे फेकून दिलं जात आहे.
आजच्या मुंबई महानगरीत, पदोपदी आढळून येणाऱ्या ह्या भीषण वास्तवाला सामोरा जाणारा आणि या प्रखर वास्तवाला आपल्या कवितेतून वाचा फोडणारा एक मनस्वी कवी, या दृश्याकडे पाठ फिरवून जिथं या महानगरीची हद्द संपते आणि जिथून समुद्राच्या अस्वस्थ लाटांची वहिवाट सुरू होते त्या दोहोंमधल्या ‘बीच’वर येऊन समोरच्या समुद्राच्या मंथनाचा एकीकडे तो वेध घेत आहे तर दुसरीकडे तो एका ‘शून्य बाजीरावा’च्या आविर्भावात उभा आहे, आणि आपल्या अस्वस्थ मनात उचंबळून येणाऱ्या ‘स्वगतां’च्या कल्लोळांचा कानोसा घेत आहे. अशावेळी, आजच्या ‘तो’ला कालचा ‘तो’, आजवर आपण समुद्राशी वेळोवेळी केलेल्या हितगुजाबद्दल सांगत आहेः
लहानथोर या समुद्रापाशी
इथूनच मी जाळीदार पानांच्या
चिटोऱ्या चिटोऱ्या
तुकडे करकरून सोडून दिल्या
लहानथोर गोष्टी
ज्याच्या त्यांच्यात वाळूंतले किल्ले
हवेले इमले स्वप्नातले खेळ
भिजून स्वरूप लाटांचं
पायाखालची वाळू सरतांना
लाटांचे अन् वाळूंचे नकाशे कुणी काढावेत
तो जुळून आपसुक जपावे मनात
लाटांनी लहरत रहावं
वाळूनं सरत रहावं
लहानथोरांनी ज्याच्या त्यांच्यात हरवून रहावं

(‘समुद्र’, पृष्ठ ४५)

तर, आजचा ‘तो’ कालच्या ‘तो’ला मुंबईची हालहवाल सुनावतांना म्हणतो आहेः
वाळूत टॉवर बांध
आणि राणीच्या गळ्यातला हार
गहाण ठेव समुद्राकडे

ठोकरून दे इकडचे दुनिया
शांघायच्या राशीत
आणि गरीबी अमीरीच्या
त्सुनामीत हलव मुंबई

(‘शब्द’ दीपोत्सव, २००८)

परंतु, ‘मुंबई’ ह्या शब्दाजवळ येऊन थांबलेल्या कवितेचं नाव काय? तर - ‘अंबई’! आणि आपण गडबडून जातो. पण यात गडबडून जाण्यासारखं काय आहे? कारण आजपर्यंत ‘मुंबई’ची अनेक नामांतरे झालेली आहेत. त्यात आणखी एकाची भर. ‘अंबानी’ या नावातले ‘अम्’ आद्याक्षर आणि ‘मुंबई’ या स्थलनामातील ‘बई’ हे अंत्याक्षर एकत्र आणलं की- ‘अंबई’! किती सूजक नाव. मुंबईचं शांघाय करण्याचे स्वप्न अशा धनिक बाळांनीच आपणाला दाखवले असेल, तर त्यात नवल काय? परंतु, कवीला प्रतीत झालेलं ‘मुंबई’चं ‘अंबई’ हे नवीन रूपडं कुठल्या मुळच्या दोन धातूंपासून सिद्ध झालं आहे- त्रयस्थ वाचकाला कसं कळणार- हा प्रश्न ती कविता वाचतांना आपल्या मनात डोकावल्याशिवाय रहात नाही.

२.
कवीच्या मनात कविता साकार होत असताना, कवीला भावलेली, त्याने दूरून वा जवळून अनुभवलेली अथवा त्याच्या सुप्त मनाच्या अबोध पातळीवर वावरत असलेली ‘अंबई’सारखी अनेक संयुगे जशी त्याच्याशी नकळत, त्याच्या कवितेच्या रसायनात मिसळत असतात, तिचा भाग होत असतात, तसंच त्याच्या व्यक्तिमत्वातून वेळोवेळी प्रकट होत जाणारे वेगवेगळे ‘तो’ही त्याच्यात लपलेले वा अद्याहृत असलेले असंख्य भाग असू शकतात. या अर्थाने, वरच्या परिच्छेदात ज्या दोन - ‘तो’चा उल्लेख आलेला आहे- त्यातला प्रत्येक ‘तो’ कालपरत्वे विभिन्न असून, त्यांच्याही पलीकडचा वा आधीचा ‘तो’ कवीच्या आधीच्या कवितेत लपलेला आपणाला आढळेल. उदाहरणार्थ, त्या दोन ‘तो’च्या पलीकडचा, स्वतःवरच वैतागलेला, कातावलेला, कावदरलेला असा तो तिसरा ‘तो’ स्वतःबद्दलच उपरोधिक भाष्य करताना म्हणतोः
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो। चांगलं झालं।
आणि मग तो आपणाला त्याच्या खाजगी विश्वात खेचून नेतो. मग तो या प्रदीर्घ कवितेच्या मधल्या वळणावर आपली गद्यप्राय दिनचर्या गद्यप्राय भाषेत कथन करताना म्हणतोः
सवय सवय म्हणून। सकाळी दात घासतो। किडू नयेत म्हणून। सकाळी टमरेल घेऊन रांगेत उभं राहतो शारीरिक शुद्धीसाठी। सकाळी आंघोळ करतो। रोग होऊ नयेत म्हणून। सकाळी वर्तमानपत्र वाचतो। जगाचं ज्ञान होण्यासाठी। मग साडेनवाला आम्ही जेवतो। जगण्यासाठी। मग ऑफिसात जातो। काम करतो। एकशे एकसष्ट रुपयांसाठी। संध्याकाळी घरी येतो। आईवडलांनी लग्न लावून दिलेल्या मुलीबरोबर फिरायला जातो। चौपाटीवर फिरायला जातो। नारियलका पानी पितो। घरी येतो जेवतो। मी माझ्या खाटेवर झोपतो। ती तिच्या खाटेवर झोपते। सवयीनुसार मी तिच्या खाटेवर जातो। कधीकधी तीही माझ्या खाटेवर येते। सकाळी मात्र आम्ही। ती तिच्या खाटेवर असते। मी माझ्या खाटेवर असतो। आई बाहेरच्या खोलीत असते। वडील गॅलरीत असतात। मग मी दार उघडतो। दुधाच्या दोन बाटल्या हातात घेतो। आदल्या रात्रीचा शर्ट घालतो। तीन जिने उतरतो। दूधसेंटरवर येतो। चोपन्न पैसे देतो। दोन बाटल्या घेतो। दुधाच्या। तीन जिने चढून पहिल्या खोलीत येतो। तेव्हा बायको स्टोव्ह पेटवते। मग मी दात घासतो। आदल्या दिवसाप्रमाणंच सर्व करतो
(अरण्य, पृष्ठ १६)
इथे, मुंबईतल्या १९६०च्या आगे-मागे आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या चाळ संस्कृतीचं आणि तिच्या वाढलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या चाकोरीबद्ध जीवनरहाटीचं निवेदन या कवितेचा निवेदक असलेला ‘तो’ आपणाला ऐकवित आहे. तर या कवितेआधी उद्धृत केलेल्या कवितांतून डोकावणारा निवेदक हा मुंबईत नव्यानं उभ्या राहू पाहणाऱ्या ‘टॉवर’ संस्कृतीचा विरोधक असून, या टॉवर संस्कृतीमुळे आपली चाळ संस्कृती समूळ नष्ट होणार आहे आणि आपण देशोधडीला लागणार आहोत हे त्याला आता कळून चुकलं आहे.

३.
ह्या दो ‘तो’च्या पलीकडचा आणखी एक ‘तो’ही या व्यक्तिमत्वात कधीकाळी निवास करीत असताना आपणाला आढळेल आणि ‘तो’ आज फारसा कुणाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. त्यावेळेचं त्याचं हे जग किती ‘अमानुष’ आहे, हे सुचविण्यासाठी, त्याच्या भोवती पसरलेल्या नि प्रचंड यांत्रिक खटाटोपाच्या कोलाहलात हरवलेल्या आपल्या भोवतीच्या जगाचा, पसाऱ्याचा वेध घेताना, त्याला क्षणभर भास होतो की, या आवाजांच्या कर्कश धबडग्यात माणसांचा आवाज कुठाय? तो तर या आसमंतात ऐकूच येत नाही इतका क्षीण झालेला आहे. याची जाणीव होताच त्याला दरदरून घाम फुटतो आणि मग आपल्या निवेदनाची सुरुवात तो मुंबईच्या गोदीत पसरलेल्या अमानुष आवाजांची भली मोठी जंत्री देत, त्या आवाजांच्या दडपल्या गेलेल्या, चिरडल्या गेलेल्या मानवी आवाजाचं वर्णन एकाच ओळीत करतो- ‘ऊं ऊं ऊं ऊं ऊं ऊं ऊं ऊं’ जणू काही त्या क्रेन, हातगाड्या, मालट्रक आणि मशिनने भरलेल्या आवाजाच्या जङ्नव्याळ अवकाशातील मानवी अरण्यरुदनच! ते अरण्यरुदन पुढील शब्दात व्यक्त होतेः
घुर्रर गुऱर् भकाक भकाक भक
थडाडथड डुमडुम फस्स् खुऱर्
डंग पों पों पों फुरर ठकाक ठक
खस खस खस फटाक फटाक फट
भुस भुसुर भुस डोंग डोंग डोंग
‘ऊं ऊं ऊं ऊं ऊं ऊं ऊंऊं

(गोदी, पृष्ठ ३)
परंतु, मुंबईतल्या ‘गोदी’ परिसरात सतत फिरत असलेल्या तिथल्या जीवचक्राशी आपण परिचित नसाल, तर कवीने ‘गोदी’ या विषयावर लिहिलेल्या पंधरा कवितांच्या साखळीतील वरील कवितांशांचा अर्थ कळणे कुणालाही अवघडच आहे.

४.
‘गोदी’ या विषयावरील पंधरा कवितांच्या साखळीमधील पहिला कवितांश असाः
अंगभूत माणसं बसतात हगायला बसल्याप्रमाणे रोजगारीसाठी
तंबाखूची पिचकारी टाकत पायाची भोवरी काढणारी माणसं
कानातला मळ काढणारी माणसं भटकतात गांधी टोप्या
काळ्या टोप्या चरख्याचा झेंडा लाल झेंडा गर्दी करतात
माणसं गव्हातांदळाच्या भरून जाणाऱ्या गाड्या
रस्त्यावर सांडलेलं धान्य गोळा करतात बाया
निवडून जगतात चिपाडं आयुष्य शेंगा केळी
गाजरं टेलिफोन वाजतो १० माणसासाठी गुरासारखी
माणसं चढतात एकमेकावर हातगाड्यांचा खडखडाट
बैलगाड्यांची चाकं मोटारी लॉऱ्या विश्वाचा
फापटपसारा संभाळत माणसं किड्यासारखी एकत्र
हिजडे वाजवतात टाळ्या हॉटेलसमोर आणि वर करतात वस्त्र
आणि उचलून घेतात पाव आणि म्हणतात गाणी
तुम्हारे बिना हम जी नही सकते तूं तो हमारा
पहले जनमका साथी वेडझव्यासारखा मी पहात हे

- हे दृश्य अलेक्झांड्रा डॉक म्हणजेच ‘घड्याळ गोदी’च्या प्रवेशद्वारापाशी आढळणार. आणि ह्या दृश्याची गतिमानता तुटक तुटक शब्दपुंजांतून अधिकच अर्थवाही बनते. ‘गोदी’मधील अखेरची कविता अशी आहेः
लायनी जन्माचे भोग जीवन म्हणजे पाणी आणि घोंघावणाऱ्या
माशा विषयीवीणा विषयवासना विषय विचविचित काही
पचपचित-बटबटीत पाणी आणिक रंगीत सूर्योदय
सूर्यास्त निशाण्या वरखाली आयुष्य केबिनमधल्या
नागड्या उघड्या स्त्रिया माणूस सांगाडा आठवणी
खोट्या खोट्या वाटणाऱ्या भोग प्रत्येकी शून्य
वाट्यास येणारं जगणं १ला वर्ग २रा वर्ग
फांशी काळंपाणी सक्त साधी मजुरी जगाचं
बंदिस्त जळत जाळत आयुष्य उभावत
दोन पावलं चार पावलं पडल्याचा आविर्भाव
सावरल्याचं सोंग २चे ४ हात सावकाश
बालीशपणे हालचाली पहात सर्वत्र अनोळखी
आसमंत कुबट मजा हे वेगळंच पण थोड्या
जवळीक सागरिक लांब समोर
डोळ्यात येणारं पाणी खारं समुद्र
खारा शांत बाहेर कल्लोळ तरीही शांत
तरंग पाण्यावरचे रंग पुढे पुढे विद्ध
शांत रिकामं मन बाजूला दिसतंय
शरीर आदळतंय टबात भरल्या णाऱ्या
मॅगनिज ओरप्रमाणे.

- हे मुंबई बंदरातील गोदीच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणारं गोदीतलं आणि गोदीच्या संपर्कात येऊन, नांगरलेल्या बोटीतलं जीवन, शब्दातून मांडणारी ही कविता इ. स. १९६७ पूर्वी लिहिलेली आहे, हे आज कुणाला खरं वाटेल काय?

५.
वरील कवितांच्या तुकड्या-तुकड्यातून नकळत डोकावणारं आणि आपल्यासमोर क्रमाक्रमानं उलगडत जाणारं एक विलक्षण जग, हे आपल्याभोवती पसरलेल्या एका विशाल आणि विस्तृत अशा ‘लॅण्डस्केप’चा भाग असून, हरघडी बदलत जाणाऱ्या, उत्क्रान्त होत जाणाऱ्या लॅण्डस्केपचं चित्रण कवी, आपल्या वरील कवितांमधून करीत असल्याचं आपल्या प्रत्ययास येतं. त्याचबरोबर, तिच्यात वर्णित आणि सूचित केलेल्या वस्तुजातावरून अथवा तिच्यातून अधूनमधून डोकावणाऱ्या, कवीला लाभलेल्या समुद्रसान्निध्यावरून ही ‘क्वीन्स नेकलेस’ गळ्यात घालून रात्रीची मिरवणारी ही ‘बारा’नगरी मुंबईशिवाय अन्य कुणी असूच शकत नाही, हेही आपल्या लक्षात यायला वेळ लागत नाही. ह्या जाणिवेबरोबरच, ह्या कवितेची आणि पर्यायानं तिच्यामागे लपलेल्या कवीचीही नाळ मुंबईशी जोडली गेली असावी, हे आपणाला प्रथमदर्शनीच प्रतित होतं. किंबहुना कवीच्या अस्तित्वाचा वेध घेणं म्हणजेच... त्याच्या कवितेचा शोध घेणं किंवा त्याच्या कवितेचा वेध घेणं म्हणजेच अपरिहार्यपणे त्याच्या अस्तित्वाचाच शोध घेणः इतकं त्याचं व्यक्तित्व आणि कवित्व एकरूप झालेलं आहे- असं म्हटल्यास वावगं होणार नाही. असा हा एवंगुणविशिष्ट, मुंबईच्या आणि पर्यायानं तिच्यात माजलेल्या बजबजपुरीच्या आणि अनागोंदीच्या अंतरंगात खोलवर डोकावून पाहणारा, गेली सतत पन्नास वर्षे कवितेची अखंड उपासन करणारा एक व्रतस्थ, महनीय परंतु उपेक्षित नि दुर्लक्षित मराठी कवी म्हणजे कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर.
आता, या वर्णित पार्श्वभूमीवर, कवीबद्दल आपल्या मनात काही गैरसमज उद्भवणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ, हा कवी फक्त मुंबईवरच कविता लिहितो काय? तर, असं काहीही मनात आणू नका. ‘मुंबई’ हा विषय ही काही त्यांच्या कवितेची मक्तेदारी नाही. खरं म्हणजे मुंबईचं असं काहीही बरवाईट करण्यात त्याचा कधीही काहीही हात नव्हता, परंतु, त्यांचं व्यक्तिगत बरंवाईट करण्यात मात्र प्रत्यक्षाप्रत्यक्ष मुंबईचा नक्कीच हात होता. उदाहरणार्थ, मुंबईत वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकालाच तणावग्रस्त वातावरणात पसरलेल्या एका दाबदबावाला नि पर्यायानं ताणतणावाला प्रत्यही सामोरं जावं लागतं. गुर्जरही त्याला अपवाद असणे शक्य नव्हते. उलट, ते संवेदनशील मनाचे एक पारदर्शक कवी होते. त्यामुळे, ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’च्या ‘सिन्ड्रोम’नी त्यांना ऐन तारुण्यातील काही काळ घेरलेले होते. एकूण त्यांच्या कवितेप्रमाणेच त्यांना छळणारा त्यांचा हा आजारही ‘अत्याधुनिक’, ‘मानसिक’ आणि ‘शहरी’ होता असं त्यांच्याबाबतीत मला गमतीनं म्हणावंसं वाटतं.

६.
परंतु, मुंबई महानगरीवर कविता लिहिणारे वसंत दत्तात्रेय गुर्जर हे काही ‘पहिलेच’ अथवा ‘एकटेच’ कवी नाहीत. या दृष्टीने आपण आपल्या आधुनिक मराठी साहित्याच्या इतिहासाचा स्मृतिरुप मागोवा घेतला तर, एकोणिसाव्या शतकाच्या सीमारेषेवर नांदणाऱ्या आणि अंगावर उद्योगधंद्याचे, समृद्धतेचे नि संपन्नतेचे आधुनिक अलंकार तोऱ्यात मिरवणाऱ्या नखरेल मुंबईची भुरळ सर्वप्रथम श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी (१८६८- २२ डिसेंबर १९४५) ऊर्फ ‘पठ्ठे बापूराव’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका प्रतिभावंत शाहिराला पडलेली आढळते. तो आपल्या लफ्फेदार आणि ठसकेदार अशा मुंबईवरील दिलखेचक ‘लावणी’त म्हणतो-
मुंबई ग नगरी बडी बाका
जणू दुसरी रावणाची ग लंका
    डंका चहुमुलखी...
राहण्याला गुलाबाची फूल कीS
    पाहिलीS मुंबSSईS... मुंबईSS

- परंतु नारळी पोफळीच्या बागांनी आणि त्यांच्या आडोशाने वाढलेल्या वेगवेगळ्या वाड्यांनी आणि पाणथळ जागांनी वेढलेल्या मुंबईतल्या दादरसारख्या भागात १९१० पर्यंत तुरळक मानवी वस्ती होती. यावरून म्हणता येते की पठ्ठे बापूरावांच्या काळातली ही ‘राहाण्याला गुलाबाच्या फुलाप्रमाणे असलेली’ मुंबई गिरगाव, भायखळ्याच्या पलीकडे फारशी पाय पसरलेली नव्हती.
त्यामुळे त्यानंतरची दोन-तीन दशके उलटततात न उलटतात तोच आपल्यासोबत नवी प्रतिमाने, तिरकस प्रतिमा आणि चौरस विभ्रम घेऊन नव्या प्रकारची कविता अवतरताना दिसते. तिचं सख्य मुंबईशी असून आपण कुठून आलो याची जन्मखूण तिने आपल्यासोबत बाळगलेली आहे, ती ते सांगताना म्हणते-
जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकूरद्वारा,
खडखडते अन् ट्राम वाकडी
कंबर मोडुनी, चाटित तारा

- अशा तऱ्हेने या कवितेला त्या काळच्या गिरगावची सांस्कृतिक पृष्ठभूमी लाभलेली आहे. याच कवितेत कवीला तिथे चालणाऱ्या शिळ्या शृंगाराचे वर्णन करताना पठ्ठे बापूरावाच्या फडातील प्रख्यात नाची ‘पवळी’ हीची जाताजाता आठवण झाली आहे. तो म्हणतो-
त्या नाक्यावर तंग हवेली
उत्साहाची ठिगळ्या चोळी
घालुन बसली बोथटलेली
शिळी स्तनाग्रे झाकित
(नका टाकून जाऊ, चोळामोळा घाण्याने माझा झाला...) – पवळी

- अर्थात, हा ‘गोलपिठ्या’आधी मराठी कवितेत अवतरलेला ‘गोलपिठा’ आहे. आणि त्या कवितेचे जनक आहेत बा. सी. मर्ढेकर! कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या समग्र कवितेत मुंबईसंबंधीच्या अशा असंख्य प्रतिमा आणि उक्ती आढळत असल्या तरी मुंबईतले रस्ते साफ करणाऱ्या झाडुवालीचे शब्दचित्र अत्यंत उत्कट आहे-
देवाजीने करुणा केली
सकाळ नित्याची ही आली
जणू पायाने चित्याच्या अन्
रस्ता झाडी झाडूवाली

- इथं मुंबईचं अंगप्रत्यंग कवीला येऊन भिडलं असल्याचं आपणाला जाणवतं.

७.
मुंबईनगरीवर कविता लिहिण्याचा प्रारंभ जरी पठ्ठे बापूरावापासून झाला असला तरी त्यानंतर आलेल्या मुंबईवर कविता लिहिणाऱ्या या दोन मुंबईकर कवींनी मोठी मोलाची भर टाकून ती परंपरा समृद्ध केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्या प्रत्येकाच्या कवितेत प्रतिबिंबित झालेली मुंबई त्या त्या वेळची आणि वेगळीच असलेली दिसेल. उदाहरणार्थ, पठ्ठे बापूरावांच्या अनुभवास आलेली मुंबई ही परवाची मुंबई असून, त्यांच्या मते ती राहाण्यास गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत आणि सुंदर आहे. तर हीच मुंबईनगरी कविवर्य बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या काळापर्यंत येता येता काहीशी सुकलेली आणि संकोचित झालेली आढळेल. कारण तिच्या पसाऱ्यात आणि पर्यायाने तिच्या क्षेत्रफळातील प्रत्येक घरात वाढलेल्या भाऊगर्दीने प्रत्येकालाच आपल्या मालकीच्या घरात, आपण स्वतःच आगंतुक असल्यासारखे भासत आहे. म्हणूनच आपल्या ‘काही कविता’ ह्या कवितासंग्रहातील एका कवितेत मर्ढेकर म्हणतात-
दोन खोल्यांची बिऱ्हाडी। माझ्या घरी मी वऱ्हाडी
(मर्ढेकरांची कविताः १९५९, पाचवे पुनर्मुद्रणः १९९४, पृष्ठः ३१)
ह्या ओळी वाचताच घरातील खोगीर भरतीचे भान आपणाला येते, तसेच उत्तरोत्तर होत असलेल्या मुंबईतल्या जागेच्या तीव्र टंचाईचीही जाण आपणाला येते.
मुंबईचा डंका असा चहुमुलखी वाजत असल्यामुळे ही तत्कालीन परिस्थिती उद्भवली असली तरी, त्यानंतर येणाऱ्या वसंत गुर्जरांच्या फेज-१ मधील उद्भवणारी समस्या अधिक बिकट आहे. ती कविता या लेखाच्या ‘अनुबंध-२’मध्ये आधीच उद्धृत झाल्यामुळे तिचा इथे फक्त गोषवारा देत आहे- ‘आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो। चांगले झाले।’ असं उपहासात्मक पालुपद धारण करणारी ही कविता, गिरगावात राहणाऱ्या एका नवपरिणत जोडप्याची व्यथा मांडणारी आहे. त्यांच्या एकांतासाठी आतली खोली त्यांच्या वाट्याला आल्यामुळे आई बाहेरच्या पडवीत तर वडील चक्क व्हरांड्यात म्हणजेच घराबाहेर फेकले गेल्याचं विदारक सत्य इथं बाहेर आलं आहे. कशामुळे? तर जागेच्या तीव्र टंचाईमुळे! ह्यातूनच पुढे उद्भवलेल्या टॉवर संस्कृतीच्या प्रचलनाचा नि प्रवेशाचा साक्षीदारही गिरगावात आजन्म राहणारे कवी वसंत गुर्जर आहेत. आणि या आधुनिक टॉवर संस्कृतीवरच कवीने अलिकडे लिहिलेल्या कविता आज गाजताहेत. मुंबईतल्या जागेच्या प्रश्नावरून बदलाच्या आलेल्या ह्या दोन फेज एकाच माणसाने एकाच जीवनात अनुभवल्या आहेत. इतका प्रदीर्घ काळ कविवर्य वसंत गुर्जर हे गिरगावातील एकाच चाळीत रहात आलेले आहेत आणि त्यांच्या आजच्या टॉवर संस्कृतीला आणि तिच्यामागे लपलेल्या नफेखोरीला सक्त विरोध असल्याचे त्यांच्या एतद्विषयक कवितांवरून जाणवेल.

८.
गुर्जरांच्या कवितेसंबंधीचा वरील उहापोह वाचल्यानंतरच, काही लोकांच्या मनात अशी शंका उद्भवणे शक्य आहे की गुर्जरांची कविता फक्त ‘मुंबई’ याच विषयाभोवती घुटमळणारी आहे की काय? तर, तसं काहीही नाही. उलट, त्यांच्या कवितेबद्दल असा ग्रह करून घेणेच मुळात चुकीचे ठरेल. कारण, मुंबईसारख्या आधुनिक नि अद्ययावत जगाचं प्रतिरूप असलेल्या एका जगङ्व्याळ महानगरीत राहून केवळ इथली वा खेड्याच्या पार्श्वभूमीवरची ‘लॅण्डस्केप्स’ आपल्या ललितमधुर भाषेत रंगविण्यापेक्षा इथल्या मानवी अस्तित्वाला व त्रस्त करणाऱ्या इथल्या जटिल समस्यांना आपल्या कवितेच्या माध्यमातून भिडणे आणि आपल्या मनातील खळबळ, अशांतता नि उद्रेक व्यक्त करणे हे अधिक स्वाभाविक नाही काय? या अर्थानं गुर्जर हे खऱ्या अर्थानं आजचे ‘कॉन्टेम्पररी पोएट’ ठरतात. आणि हयातभर ते मुंबईतच श्वास घेत आलेले असल्यामुळे त्यांच्या अनुभवविश्वाला मुंबईची एक पार्श्वभूमी, एक किनार, एक पदर, एक रंग, गंध आणि अनुभवांचे बनलेले एक रसायन त्यासाठी अद्याहृत असणे सहज शक्य आहे. त्यामुळे, त्यांच्या कवितेत ती अप्रत्यक्षरूपात हजर असतेच.
उदाहरणार्थ, त्यांच्या १९७९ साली, ‘प्रास प्रकाशना’ने प्रकाशित केलेला आणि त्यांनी ‘समुद्राला-’ अशी वेगळीच अर्पणपत्रिका केलेला, ‘समुद्र’ या नावाचा कवितासंग्रह घ्या. त्या कविता संग्रहात कवीच्या एकूण ५१ कविता संकलित झाल्या असून त्या कवितांना वेगळी शीर्षके नसून शीर्षभागी फक्त क्रमांक वा आकडे आहेत. का? ही समुद्र नावाची एकच कविता असून तिचे क्रमांकाने निर्देशित केलेले अनेक ‘अंश’ अर्थपूर्णरित्या एकत्र गुंफलेले आहेत असा तर त्या निर्देशांकांचा अर्थ होत नाही ना? किंवा या प्रदीर्घ कवितेतून एकच भाववृत्ती खेळवली गेली आहे हे सूचित करण्यासाठी त्याने शीर्षकांऐवजी अंकाचा वापर केला आहे. हे सगळे तर त्या कवितेच्या रचनेच्या अंगाने तर सूचित होत आहेच. परंतु या पलिकडची आणखी एक फार मोठी गोष्ट या कविताबंधातून सूचित होत आहे. या कवितेला व्यापून उरणारी एकच वृत्ती आहे, ती म्हणजे एकाकीपणाची. आणि या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालेला रितेपणा... एकाकीपणा हा कवीलाही व्यापून उरलेला आहे. हा कवीला व्यापून उरलेला एकाकीपणा सलग असल्यामुळे शीर्षकांशिवाय तो चांगलाच व्यक्त होताना आढळतो. आणि कविता अथवा भाववृत्ती मधेच संपत असल्या तरी तिथे त्यांचा शेवट नाही. त्या या कवितेचा भाग असून, तिच्या ‘वाहक’अंश आहेत.
आता, कवीला गिळंकृत करणारा त्याचा सर्वव्यापी एकाकीपणा त्यांच्या कवितेतून कसा व्यक्त झाला आहे, हे समजावून घेताना, त्यानं सुरुवातीलाच क्रमांक ‘१’मध्ये व्यक्त झालेलं एक ‘प्रास्ताविक’ कवितेतूनच प्रस्तुत केलेले आढळेल. या प्रास्ताविकात कवी म्हणतो-
हे सर्व पडके अवशेष
कित्येक वर्षांनी मी फिरत राहिलो
आधीच्या आठवणी पसरत
इथं माझे डोळे भरून साठले
तिथं मी बोलता -
हे सर्व पडके अवशेष
कित्येक वर्षांनी मी फिरत राहिलो
आधीच्या आठवणी पसरत
इथं माझे डोळे भरून साठले
तिथं मी बोलता बोलता थांबलो
हळूहळू बोलत राहिलो
अचानक डोकं मिटलं
स्वप्न आतल्या आत बंद पडले
थोड्या फार फरकानं
फारकती डोकं टेकून बसल्या
उठल्या चालल्या आठवणी
सावध अन् धाडसी खेळी करून गेल्या
आपल्याला शिकवण तर अशी
आपला त्रास कुणालाच होऊ नये
तरी हा पंक्तिप्रपंच
हे सर्व पडके अवशेष
आपण नसताना अनाहूत आलेल्यांसाठी

- अशा तऱ्हेनं आपल्या आठवणीच्या अवशेषांचं दार कवितेच्या रूपानं तो आपल्यासाठी उघडत असल्याचं जाणवतं. या कवितेची पानं चाळत चाळत आपण तिच्या ४९ क्रमांकाच्या दरवाजातून डोकावताना कवी म्हणतो-
... ज्याच्या त्याच्यात वाळूतले किल्ले
हवेतले इमले स्वप्नातले खेळ
भिजून स्वरूप लाटांचं
पायाखालची वाळू सरताना

- अशा तऱ्हेनं लहानपणी बांधलेले वाळूचे किल्ले आठवता आठवता कवी या कवितेच्या ‘समारोपा’कडे वळलेला दिसतो. ‘वाळूचे किल्ले’ आणि बालपणाचा संबंध आहे हे तर त्या प्रतिमेतून सूचित होतंच, पण या बालपणाला समुद्राची किनार आहे हे अप्रत्यक्षरित्या कळतं आणि ‘मुंबई’ची प्रतिमाही सूचित होते. इथं आपणाला कळतं की, या कवितेतून मनःचक्षुसमोर उमटणारं प्रत्येक दृश्य, प्रत्येक प्रतिमा आणि त्या अनुषंगाने कवितेत येणारं कवीच्या सभोवतालचं वातावरण हे त्याच्या भावस्थितीचा आरसा झालेलं आहे. आणि त्याच माध्यमातून तो आपल्याशी संवाद साधतो आहे.

९.
कवी वसंत गुर्जर यांचं आजपर्यंत प्रकाशात आलेलं जे कविता-विश्व आहे त्यात फक्त त्यांनी एकाच जागी आपल्या कवितेविषयक जाणिवेवर भाष्य केले आहे. आणि तेही त्यांच्या एका कवितेतच. (पहा- ‘अरण्य’- कवितासंग्रह, वाचा प्रकाशन, औरंगाबाद. आवृत्ती पहिली १९७३,
 पृष्ठ- बेचाळीस) त्या ‘२७’ क्रमांकाच्या कवितेच्या शेवटी कवी म्हणतो-
प्रत्येक कविता लिहून झाली की ती मरते स्वतःला
- हे जरी खरं असलं तरी ती इतरांसाठी उरतेच ना? आणि ती स्वतःसाठी कधीच जन्मास येत नसते तर ती कवीनं जन्माला घालावी लागते आणि पुस्तकात जेव्हा बंद असते तेव्हा ती मेलेलीच असते. परंतु ती वाचली जाताना तेवढ्यापुरती, वाचकांच्या मनात अर्थाची तत्काळ चलबिचल निर्माण करतेच ना? करत नसेल तर ती वाचकांच्या दृष्टीनही मेलेलीच असते. आणि तेवढ्याच प्रमाणात किंवा अंशानं कवीही मेलेला असतो, जिवंत असूनही. या अर्थानं कवितेचं प्रत्येक पुस्तक हे कवितेची शववाहिनीच असत नाही काय? मधून-मधून जिवंत होणारी. अन्यथा निचेष्ट पडलेली.
याच कवितासंग्रहात त्यांनी एका कवितेत (कविता क्र. ४७) स्वतःबद्दल एक अत्यंत प्रांजळ विधान केलं आहे. कवी म्हणतो-
मी कमी बोलतो
आणि एकट्यात मात्र
भडभडा
इतरांना सामसूम

- इथंच त्याच्या कवितानिर्मितीचं रहस्य आपणाला कळतं. तो कमी बोलतो म्हणजेच तो अंतर्मुख झालेला आहे आणि त्याचा स्वतःशीच स्वतःचा अखंड संवाद चालू आहे. त्यातूनच त्याच्याशी कवितेनं जवळीक साधली आहे किंवा त्यानंही आपापतःच कवितेशी जवळीक साधली आहे. इतकं हे स्वाभाविकरित्याच घडून आलं आहे. आणि त्याचं हे वारंवार स्वतःशी संवाद साधणं म्हणजे त्याच्या जीवनाच्या आणि भावभावनांच्या नोंदी ठेवणारी एक डायरीच झाली आहे. किंबहुना त्याचं जीवन हेच त्याची एक अखंड कविता झाली आहे, आणि त्याची कविता हेच त्याचं जीवन झालं आहे. त्यात भिन्नता वा अलगता उरलेलीच नाही. त्याच्यातून सतत एक प्रवाह-संज्ञाप्रवाह अखंड वाहताना मला दिसतो आहे. या अबोध मनातील, सुप्त मनातील संज्ञाप्रवाह कवितेच्या रूपात जागृत मनाच्या पार्श्वभूमीवर सतत धडपडताना, त्यासाठी शब्दांशी संघर्ष करताना दिसतो. तिथे शब्द अधिक पारदर्शक होण्याच्या नादात कधी शब्दांची तर कुठे अमूर्त भावनांची चलबिचल होताना, धांदल उडताना दिसते. त्यातून एखादा शब्द गळालेला दिसतो. कधी ‘अंबाई’ शब्द येण्यापूर्वी त्याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी अंबानी + मुंबई = ‘अंबाई’ हे कळण्यासाठी त्याच्या आधी काही उलगडा होताना दिसत नाही. कारण ती त्याची ‘डायरी’ आहे. आणि त्याला तर आपल्या जीवनात काय घडलं ते निश्चित माहीत आहे. मग उगाच स्वतःचा खुलासा कशाला?

१०.
खरं तर, गुर्जरांच्या सगळ्या कविता मिळून ते जन्मभर एकच कविता लिहीत आहेत असं मला सतत वाटत आलं आहे. कारण ते कवितेत लिहिलेलं त्यांचं आत्मवृत्तच आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांच्या अंतर्मनात सतत नि संतत वाहत असलेल्या संज्ञाप्रवाहाचे वेगवेगळ्या कवितेच्या रूपात ‘स्लाईसेस’ करताना ते त्या तुकड्यांना नाव न देता नंबर देतात. त्यामुळे ती कविता त्या अर्थानं सीमित होत नाही आणि आज कविता विषयावर लिहिली जात नाही, तर तिच्यात व्यक्त होणाऱ्या कवीच्या भावना, कल्पना नि विचार हे तिच्या रसायनात संमिश्र रूपाने उतरत असतात, हे ओळखूनच कविवर्य मर्ढेकरांनी बिनशीर्षकाची कविता लिहिण्याची पद्धत मराठीत प्रथमच रुचवली हे शहाणपणाचे नव्हे काय? गुर्जरांनीही आपल्या कवितेचे असे शीर्षकधारी ‘काम’ केलेले नाहीत- हा त्या सुजाणपणाचाच भाग आहे- असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या एखाद्या कवितेची सुरुवात कुठून होईल हे जितके अनाकलनीय नि अकल्पित असेल, तसाच तिचा शेवटही अनाकलनीय नि अकल्पित होत असल्यास नवल ते काय?
गुर्जरांच्या कवितेसोबत प्रवास करताना, गुर्जरांना काहीतरी वाटेत ‘हरवले-सापडले’चा भास सतत होतोय... तसाच मलाही होतोय, उदाहरणार्थ ते एके ठिकाणी (समुद्र- प्रास प्रकाशन-१९७९, पृष्ठ एकवीस) म्हणतात-
काही तरी हरवलं आहे
आणि ते मी शोधतोय
काहीतरी सुचलंय
ते मी हरवतोय

- अशा वेळी माणसाचं काय हरवत असतं याचा मी सतत शोध घेत आलेलो आहे. आणि त्यासाठी मी आदिमानवाने गुफेत आणि पाषाणावर रंगविलेल्या चित्रांचा गेली चाळीस वर्षे शोध घेत आहे. आणि त्यासाठी मी जगभर विखुरलेल्या या चित्रठेव्यांची छायाचित्रे ज्या ज्या ‘नॅशनल जिऑग्राफीक’च्या अंकात छापलेले आढळतील, ते अंक मी जमवित आहे. का? कारण माणसाचे काय हरवले आहे? तर- अतित! आणि ते त्याचे अतित, त्याने गुहाचित्रात कोरलेल्या आपल्या चित्रकलेच्या रूपाने- आदिम कलेच्या रूपाने आजही त्याची वाट पहात उभं आहे. तो गेली लक्षावधी वर्षे ज्या ज्या वाटांनी जगभर चालत गेला, त्या त्या वाटांवर उभं आहे. चित्रकला ही त्याची आदिम भाषा आहे. आजच्या आपल्या भाषांच्या आधीची ती विश्वात्मक भाषा आहे. आणि ती स्पेनमधल्या अल्तामिरापासून ऑस्ट्रेलियातील आदिमानवापर्यंत पसरली आहे. तिच्यात जी उत्सफूर्तता आहे, रेषांतला जो जोम आहे तो आपल्या भाषेत नाही... तो आपल्यातून हरवला आहे- ही जाणीव बहुतेक कवींना आज झाली आहे. म्हणून ते चित्र काढतानाही आढळतील. गुर्जरही यापैकी एक कवी आहेत. ज्यांना शब्दांपलीकडचं काही हरवलं आहे असं वाटतं तेच या ‘अनाकलनीय’ भाषेच्या शोधात आहेत. किंवा आपल्या कवितेतून ते भाषेची ठरीव ‘हद्द’ मोडू पाहत आहेत. म्हणूनच गुर्जर या कवितेच्य शेवटी म्हणतात-
काहीतरी हरवलं आहे
काहीतरी शोधतोय
काहीतरी लिहितोय
ती रक्तातली कविता मी जपतोय

- गुर्जर आपल्या कवितेतून याच आदिम भाषेकडे जाण्याचा मार्ग शोधतात.

११.
गुर्जरांच्या सुरुवातीच्या कविता सहज आत्मसात होतात. उदाहरणार्थ, ‘आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।’ (अरण्य), अथवा ‘चित्रा नाईक’ (अरण्य) या कविता सहज कळतात. गुर्जरांची ही नाट्यमय कविता आणि ‘गोदी’ हा पहिला कवितासंग्रह मी ‘लिट्ल मॅगझिन्स’च्या काळात छापला होता. त्यांची ‘चित्रा नाईक’ ही कविता १९६२च्या सुमारास अत्यंत गाजली होती. आणि त्यांची सर्वांत गाजलेली सर्वश्रेष्ठ कविता म्हणजे अशोक शहाणे यांनी छापलेली, आणि तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे प्रसिद्धी पावलेली ‘गांधी मला भेटला’, पण त्याबद्दल नंतर कधीतरी!
वसंताच्या आणि माझ्या मैत्रीला या वर्षी पन्नास वर्षे पुरी झाली. परंतु त्या मैत्रीबद्दल काहीही न लिहिता, त्याच्या कवितेबद्दलच लिहिले- याबद्दल क्षमस्व!
***

हा लेख राजा ढाले यांनी 'खेळ' त्रैमासिकाच्या 'वसंत गुर्जर विशेषांका'साठी लिहिला (२०११). लेख ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यासाठी ढाले यांची फोनवरून परवानगी घेतली आहे.

Tuesday, October 4, 2011

वसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता

- प्रकाश देशपांडे केजकर

वर्तमानाची जुलूम-जबरदस्ती हे गुर्जरांच्या कवितेचे मध्यवर्ती विषयसूत्र आहे.

सामान्य माणसांच्या हालअपेष्टांना मध्यवर्ती ठेवून विव्हळ होणाऱ्या गुर्जरांच्या कवितेमागे एक असहाय अशी सार्वजनिकता आहे. त्यांच्या कवितेतील पात्रांना आपल्या वैयक्तिक दुःखाबरोबर एका सार्वजनिक दुःखाने पछाडलेले दिसते. सर्वांना मिळून भोगावयाचे असे हे दुःख आहे. एका निरस अशा नित्याच्या जीवनक्रमाने त्यांना एकमेकांशी जखडून ठेवले आहे. त्यातून त्यांना मुक्तता नाही. एकमेकांचे एकमेकांवर लादलेले सान्निध्य हाच त्यांचा दिलासा आहे.

सामान्य माणसाच्या दुःखाला आणि दैन्याला मध्यवर्ती समजून गुर्जर मानवी जीवनाचा आणि ओघानेच महानगरी जीवनाचा ताळेबंद मांडतात. त्यात जमेची बाजू नगण्य आहे. महानगरी जीवनाची काळी बाजूच या सामान्य माणसांच्या वाट्याला आली आहे. पराक्रम आणि पुरुषार्थ यांचे सगळे संदर्भ गमावून या महानगरात अत्यंत क्षुल्लक असे आयुष्य जगणे त्यांच्या निशिबी आले आहे. वाट्यास आलेले हे यःकश्चित जीवन त्यांना कधीही अर्थपूर्ण वाटले नाही. माणसाच्या क्षुल्लकपणाचे एवढे यथार्थ चित्रण मराठी कवितेत दुर्मिळ वाटावे असेच आहे. गुर्जरांच्या कवितेतील पात्रे, त्यात कवी आलाच, महत्त्वाकांक्षी तर नाहीतच, पण नाकत्वाची एकूण संकल्पनाच त्यांच्या बाबतीत अप्रस्तुत ठरावी इतके त्यांच्या पुरुषत्वाचे खच्चीकरण झाले आहे. थिजलेल्या त्यांच्या जीवनात ज्याची आवर्जून नोंद घ्यावी असे चलनवलन नाही. त्यांच्या गतिशून्य जीवनात कसलीही नवलाई नाही. अनवधानानेच त्यांना मनुष्ययोनीत वर्ग करण्यात आले आहे असे वाटते. जुलूम सहन करण्याची त्यांची क्षमता केवळ पशुतुल्य आहे. उगाचच जन्माला येऊन उगाचच जगणाऱ्या बापुड्यांचे हे जग आहे. सामान्य माणसाच्या या गलितगात्र अवस्थेची अनेक रूपे चित्रित करण्यात गुर्जरांच्या कवितेची महती आहे.

(एका पुस्तकातील मोठ्या लेखातील थोडासा भाग)